मुंबई - प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होत असून, या जोडीला अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मान्सून निष्क्रिय झाला आहे. ओढ घेतलेला मान्सून या आठवड्यातही कोसळणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा आठवडाही कोरडा जाणार असून, २० जुलैनंतर कदाचित मान्सून पुन्हा सक्रिय होईल. परंतु, त्याचा जोर हवामान बदलावर अवलंबून असणार आहे.
हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारपासून पुढील रविवार-सोमवारपर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाची फार शक्यता नाही. बुधवारी आणि गुरुवारी किंचित पावसाची शक्यता असली तरी यातून फार काही दिलासा मिळणार नाही. थोडक्यात मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस फार सक्रिय नसेल.
👉...तर मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट!
जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी पावसाअभावी मराठवाड्यात ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दुसरीकडे पाच दिवसांपासून पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
👉राज्यात काय परिणाम ? :
२० जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र तयार झाले तर अफगाणिस्तातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांना अटकाव होईल. हे कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाच्या जवळ असेल, त्यामुळे विदर्भात किंचित जास्त पाऊस असेल, तर मराठवाडा परिसरात फार पाऊस पडणार नाही. हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यासारखा नसेल.
👉विदर्भात जलसाठे आटले
दरवर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच बहुतेक जलसाठे अर्धेअधिक भरून गेलेले असतात. यावर्षी मात्र दडी मारलेल्या पावसाने तोंडचे पाणी पळविले आहे. पावसाने दडी मारल्याने विदर्भात पावसाची तूट २७ टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे जलसाठेसुद्धा आटत चालले असून, गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के पाणी कमी साठा उपलब्ध आहे
Post a Comment