जनगणनेत हवा ओबीसींचा काॅलम...२८ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन गोंदियातील लोकप्रतिनिधींची भेट घेत पाठिंब्याची मागणी सकल ओबीसी संघटनांकडून जिल्ह्यात जनजागृती; संसदेत व विधिमंडळात आवाज उठवण्याचे साकडेसारस एक्सप्रेस गोंदिया:

सारस एक्सप्रेस गोंदिया: ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आगामी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे आंदोलन अत्यंत निर्णायक ठरणार असून, यात गोंदिया जिल्ह्यासह राज्य व देशभरातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल ओबीसी महामोर्चा, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि ओबीसी अधिकार मंचसह इतर घटक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांना विधिमंडळ व संसदेत वाचा फोडण्यासाठी सकल ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेतली. या अंतर्गत खासदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार इंजि. राजकुमार बडोले आणि आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आगामी अधिवेशनात ओबीसी जनगणनेसह इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा घडवून आणावी आणि दिल्लीतील धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती या वेळी करण्यात आली. सर्व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा दर्शवत ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने दिल्लीत उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

आगामी काळात होणाऱ्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसी समाजाची स्वतंत्र व अचूक नोंद होणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. समाजाची नेमकी लोकसंख्या, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती यांची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी स्वतंत्र जातनिहाय जनगणना गरजेची आहे. या अचूक आकडेवारीच्या आधारे समाजाच्या विकासासाठी प्रभावी धोरणे आखता येतील; तसेच आरक्षण, शैक्षणिक सुविधा, रोजगार, सामाजिक न्याय आणि विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
लोकप्रतिनिधींची भेट घेताना मनोज मेंढे, सुनील पटले, खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे, एस. यु. वंजारी, रवी अंबुले, सुरेंद्र सोनवणे, नरेश परिहार, प्रकाश पटले, अजाबराव रिनायत, डॉ. प्रदीप रोकडे, भिवपूरचे सरपंच राजकुमार ठाकरे, सुनील भोंगाडे, भूमेश शेंडे, सावन कटरे, मनोज शरणागत,भोजराज फुंडे,माधव तरोणे,दिनेश हुकरे यांच्यासह अनेक ओबीसी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

आंदोलनातील प्रमुख मागण्या:

आगामी २०२७ च्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम व ड्रॉप-डाऊन सूची समाविष्ट करून जातनिहाय जनगणना करावी.

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी.
ओबीसींच्या क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा तातडीने वाढविण्यात यावी.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post