शेताच्या कुंपणात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यूसारस एक्स्प्रेस गोंदिया

        सारस एक्स्प्रेस गोंदिया
शेताच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे रविवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शिकारीच्या शोधात असताना बिबट्या शेताभोवती लावलेल्या कुंपणात अडकला, यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बोरकन्हार येथील शेतकरी कटरे यांच्या शेतात रविवारी बिबट्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या अवस्थेत असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित शेतकरी व वनविभागाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहेे. शेतातील पिकांचे तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी शेतीला तारेचे कुंपण लावतात. मात्र, अशा कुंपणामुळे वन्यप्राणी अडकून जखमी होण्याच्या घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यातच बोरकन्हार येथील घटनेमुळे शेतालगतच्या भागात वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू नेमका कुंपणात अडकल्याने झालेल्या दुखापतीमुळे झाला, की अन्य काही कारणामुळे, याचा तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून वनविभागाच्या तपासातून या घटनेमागील संपूर्ण परिस्थिती समोर येणार आहे. 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post