सारस एक्स्प्रेस
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया:
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती मातेला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात यश आले आहे.पुराचा वेढा पडण्यापूर्वीच आरोग्य विभागातील मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथक देवदूत बनुन गरोदर मातेला प्रसुती साठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.ह्या कार्यात मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील येरणे व डॉ. वंजारी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
तालुक्यातील मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या फुक्किमेटा उपकेंद्रातील सलियाटोला हे गाव सध्या पूरस्थितीमुळे पूर्णपणे संपर्कहीन झाले आहे.या गावातील २५ वर्षीय गर्भवती माता रेखा भोलाराम मडावी हिची प्रसूतीची अपेक्षित तारीख ०५ ऑक्टोबर होती. मात्र, गावाला पुराच्या पाण्याचा वेढा असल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता होती.
आरोग्य पथकाकडून समुपदेशन-
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फुक्किमेटा उपकेंद्राच्या आरोग्य पथकाने तातडीने पावले उचलली. प्सूतीची तारीख जवळ आल्याने आणि गावाचा संपर्क तुटणार हे ओळखून, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम, समुदाय आरोग्य अधिकारी लता आवारी, आरोग्य सेविका मनिषा पडोळे, आरोग्य सेवक के.डी.फरदे व वाहन चालक विजय भेलावे तसेच स्थानिक आशा सेविका लता उईके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवुन प्रत्यक्ष उपस्थित राहून संबंधित गरोदर माता व तिच्या कुटुंबीयांचे यशस्वी समुपदेशन केले.पुराचा धोका वाढण्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी हलवणे किती गरजेचे आहे, हे त्यांना पटवून देण्यात आले.
*२६ सप्टेंबर रोजी 'माहेरघरात' भरती-*
आरोग्य पथकाच्या या समुपदेशनानंतर कुटुंबीयांच्या संमतीने, दिनांक २६ सप्टेंबर रोजी या गर्भवती मातेला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथील 'माहेरघर' येथे हलवून भरती करण्यात आले. 'माहेरघर' योजनेमुळे आता या मातेची प्रसूती होईपर्यंत तिथे राहण्याची, जेवणाची आणि नियमित वैद्यकीय तपासणीची संपूर्ण सोय मोफत केली जाणार आहे.
पूरपरिस्थितीसारख्या आपत्कालीन काळात आरोग्य पथकाने दाखवलेले हे चोख नियोजन आणि सतर्कता कौतुकास्पद ठरत असून, यामुळे संभाव्य मोठा धोका टळला आहे.माता व बाल प्रजनन कार्यक्रम अंतर्गत आरोग्य पथकाच्या केलेल्या कार्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
Post a Comment