सारस एक्सप्रेस गोरेगाव : (गोंदिया)
आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेविषयीची कृतज्ञता बाळगत एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गोरेगाव तालुक्यातील जांभूळपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट होणार आहे. या माजी विद्यार्थ्याच्या अथक प्रयत्नांची दखल घेत, आमदार राजकुमार बडोले यांच्या निधीतून शाळेला अत्याधुनिक संगणक संच मंजूर करण्यात आले. नुकतेच हे संगणक शाळेला सुपूर्द करण्यात आले असून, यामुळे आता येथील विद्यार्थीही काळाच्या पाऊलखुणा ओळखून संगणकाचे धडे गिरवणार आहेत. संगणक संच मिळवून देण्यासाठी धडपट करणाऱ्या त्या माजी विद्यार्थ्याचे नाव दीपक बोपचे असे असून तो माझी विद्यार्थी संघाचा उपाध्यक्ष आहे.
आजच्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित राहू नयेत, अशी तीव्र इच्छा जांभूळपाणी जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी दीपक बोपचे यांची होती. शाळेत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्याने थेट आमदार राजकुमार बडोले यांच्या कडे यासाठी पाठपुरावा केला. शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्या माजी विद्यार्थ्याची आपल्या शाळेप्रती असणारी निष्ठा पाहून आमदारांनी तातडीने या मागणीची दखल घेतली आणि आमदार निधीतून शाळेला संगणक उपलब्ध करून दिले. संगणक संच मिळतात येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या प्रसंगी ममताताई गदवार (उपसरपंच मुरदोली), तेजलालजी पंधरे (अध्यक्ष SMC),दिपक बोपचे (उपाध्यक्ष मा विस),देवेंद्रजी कटरे (सामा. कार्यकर्ते) ,सुनिताताई राहांगडाले (सदस्य ग्रामपंचायत) ,राजेंद्रजी शेंदुरकर (समन्वयक गुरुदेव सेवा मंडळ),शुभम डहाके, अनिल बिसेन व हितेंद्र बोपचे आदि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
(वृत्त संकलन: किशोर मेश्राम सारस एक्सप्रेस)
Post a Comment