गोंदिया लोकल क्राइम ब्रांच : १२ तासांत उलगडला हत्येचा थरार सारस एक्सप्रेस नेटवर्क गोंदिया

सारस एक्सप्रेस नेटवर्क गोंदिया 
गोंदिया ,दि.२८:आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोथली शेतशिवारात झालेल्या ६१ वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा स्थानिक गुन्हे शाखा (LGB) गोंदियाच्या पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. जमिनीच्या व्यवहारातून मिळालेले पैसे शेअर मार्केटच्या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बुडल्याने, ते पैसे परत करण्याच्या वादातून मध्यस्थानेच डोक्यात विटाने घालून वृद्धाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.
.   👉काय आहे नेमकी घटना?
मृतक चंद्रशेखर भास्कर दहीकर (वय ६१, रा. बोथली) हे आपल्या घरी एकटे राहत होते. सप्टेंबर २०२६ मध्ये त्यांनी आपली आमगाव येथील जमीन गावातीलच अजय ब्राह्मणकर याच्या मध्यस्थीने विक्री केली होती. या व्यवहारापोटी ५ लाख रुपये टोकन म्हणून मिळाले होते, त्यापैकी ४ लाख रुपये अजय ब्राह्मणकर याच्या बँक खात्यात ठेवण्यात आले होते.दरम्यान, जमिनीचे कागदपत्र व्यवस्थित नसल्याने सौदा तुटला आणि खरेदीदारास २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत टोकनचे पैसे परत करायचे होते. त्यामुळे मृतकाने अजयकडे आपले ४ लाख रुपये परत मागितले. मात्र, अजयने हे पैसे शेअर मार्केटच्या 'इंट्राडे ट्रेडिंग'मध्ये गुंतवले होते आणि ते पूर्णपणे बुडाल्यामुळे त्याच्याकडे मृतकाला देण्यास एकही पैसा नव्हता.

👉असा लागला गुन्ह्याचा छडा
२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता बोथली शेतशिवारात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पाटील सौ. शकुंतला पाथोडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम १०३(१) भा.न्या.संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी संशयित अजय शामराव ब्राह्मणकर (वय २१, रा. बोथली) याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.
आरोपी अजयने २६ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास मृतकास गावाकडून घरी परतत असताना गाठले आणि डोक्यावर व छातीवर विटाने मारून खून केला. त्यानंतर मृतदेह घरासमोरील झुडपात लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आमगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अमरदीप खाडे, सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके , सफौ राजू मिश्रा, पोहवा तुळशीदास लुटे, पोहवा दीक्षितकुमार दमाहे, पोहवा विठ्ठलप्रसाद ठाकरे, पोहवा महेश मेहर, पोहवा  संजय चव्हाण, पोहवा सुबोध बिसेन, पोहवा सोमेन्द्रसिंग तुरकर, पोहवा रियाज शेख, पोहवा  राजकुमार खोटेले, पोहवा भोजराज  बहेकार, पोहवा इंद्रजित बिसेन, पोशि  राकेश इंदुरकर, पोशि हंसराज भांडारकर, पोशि  छगन विठ्ठले,पोशि कुणाल बारेवार, पोशि निखिल मेश्राम,  नापोशि  शैलेश निनावे, चापोशि  राम  खंदारे, चापोशि इमरान  सैय्यद, चापोशि विलेश ठाकरे, सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके,  पोशि योगेश राहिले,  श्रेयस लांबट यांनी पार पाडली.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post