महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. नांदेड जिल्ह्यातील छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, दिपनगरने द्वितीय, तर परभणी जिल्ह्यातील स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्राने तृतीय क्रमांक मिळविला.
तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाने, तर राष्ट्रीय स्तरावर देहरादूनच्या महाराष्ट्र समाज सेवा समितीने प्रथम क्रमांक मिळविला. यंदा प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्काराचे पहिले मानकरी राजन विष्णू पाटकर ठरले.
या स्पर्धेतील विजेत्या राज्यस्तर, जिल्हास्तरावरील मंडळांचा पारितोषिक वितरण समारंभ १६ ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील मुंडिपार येथील राधाकृष्ण सार्वजनिक उत्सव मंडळाचा समावेश असून या मंडळांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजेत्या मंडळांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
वृत्त असे की,गणेशोत्सवाला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गणेशोत्सवाची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली असून, देश-विदेशातील गणेशोत्सवाच्या परंपरा, कथा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये ‘Bappa.org’ या व्यासपीठावर संकलित करण्यात येणार आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत गणेशोत्सवाचा समावेश व्हावा, या दिशेनेही प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँगने प्रथम पुरस्कार पटकावला तर टोकियो – जपान मधील भारतीय वंशाचे पहिले आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या ‘एदोगावा इंडिया कल्चर सेंटर यांनी द्वितीय, तर हेसन इंडियन लेडीज असोसिएशन अँड पायोनिअर इंडियन्स ई.व्ही., जर्मनीने तृतीय क्रमांक मिळविला. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र समाज सेवा समिती, देहरादूनने प्रथम, श्री राम युवक मंडळ, बेळगावने द्वितीय, तर गुजरातमधील गणराया गणेश उत्सव मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
गोंदिया जिल्ह्यात राधा कृष्ण गणेश उत्सव मंडळ, मुंडीपारने प्रथम, बाल गणेश उत्सव मंडळ, सडक अर्जुनीने द्वितीय, तर नवज्योत गणेश उत्सव मंडळ, गोंदियाने तृतीय क्रमांक पटकवाला, यावेळी राधाकृष्ण सार्वजनिक उत्सव मंडळाचे मार्गदर्शक व ग्राम पंचायतचे उपसरपंच जावेद खान, मंडळाचे सचिव रोहित पांडे, लिलाधर भोयर, राहुल राऊत यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकार केला.या स्पर्धेसाठी १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित निवड प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३, राष्ट्रीय स्तरावरील ३, राज्यस्तरावरील ३, जिल्हास्तरावरील ९४ आणि तालुकास्तरावरील ३८ अशा एकूण १४१ गणेशोत्सव मंडळांची निवड समितीने शिफारस केली होती. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या मंडळांना मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गीतकार प्रल्हाद जाधव लिखित, गायिका संपदा माने यांनी गायिलेल्या आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेल्या देवीस्तोत्र गीतांचे लोकार्पण मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, संगीतकार कौशल इनामदार, मैथिली काळे आदी उपस्थित होते.
Post a Comment